बुद्धीची देवता असलेल्या गणरायाला निरोप देण्याची वेळ उद्यावर येऊन ठेपली आहे. या वेळच्या उत्सवाच्या काळात विविध आव्हाने होती. स्वाइन फ्लूचा उद्रेक, दहशतवादी कारवायांची भीती असे वातावरण असतानाही विघ्नहर्त्यांचा हा उत्सव सर्वत्रच अतिशय उत्साहात कोणत्याही विघ्नाशिवाय पार पडला. आता आपण त्याला निरोप देतानाही हीच काळजी घेणार का, याबाबत उत्सुकता आहे. गणेशविसर्जन आणि त्यानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकींच्या वेळी उसळणाऱ्या गर्दीत कार्यकर्त्यांनी सुरक्षेचे भान राखणे आवश्यक आहेच, त्याचबरोबर आणखी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची तितकीच आवश्यकता आहे. या गोष्टी म्हणजे-ध्वनिप्रदूषण आणि नैसर्गिक जलस्रोतांचे मोठय़ा प्रमाणात होणारे प्रदूषण! कारण त्यांचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी, स्वास्थ्याशी आणि पर्यावरणाशी आहे. आपल्या कृतीमुळे ते बिघडू नये याची काळजीसुद्धा आपल्यालाच घ्यावी लागेल. विशेष म्हणजे या वेळच्या गणेशोत्सवात अनेक मंडळांनी सद्यस्थितीचे भान राखून उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला.






